१९४९ पासुन कार्यरत सांस्कृतिक संस्था
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत, कला, साहित्य या विषयी आवड उत्पन्न करणे
आम्ही संगीत, कला, साहित्य क्षेत्रात सक्रिय आहोत. या क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकाराना हक्काचे व्यासपीठ मिळवून देतो. मंडळातर्फे “कालिका संगीत विद्यालय” चालविले जाते त्यात माफक शुल्कात भारतीय शास्त्रीय संगीत, हार्मोनियम, व तबला यांचे शिक्षण दिले जाते.
या मंडळाची स्थापना कराची (सिंध) मधून निर्वासित म्हणुन आलेल्या गोमंतकिय दैवज्ञ ब्राम्हण समाजाने केली.
अखंड हिंदूस्थानच्या फाळणी नंतर जे बांधव निर्वासित म्हणून हिंदूस्थानात आले त्यापैकी कराची प्रांतातून निर्वासित म्हणून आलेले गोमंतकिय बांधवही उल्हासनगरला स्थायिक झाले.
१९४९ साली श्री कालिका कला मंडळ या संस्थेची स्थापना भिकाजी वासुदेव चोडणकर, विष्णू भिकाजी चोडणकर, घनःश्याम वामन बानोडकर, सदाशिव अनंत लोटलीकर, चंद्रकांत हरिश्चंद्र चोडणकर, बाबुराव शंकर पेडणेकर आदींच्या पुढाकाराने करण्यात आली. गोमंतकिय बांधव म्हणजे, नाट्य व संगीत कला प्रेमी. निर्वासितपणाची मरगळ झटकून त्यांनी आपल्या उपजत कला गुणांची जोपासना करण्यासाठी आपले आराध्य दैवत "श्री कालिका माते"च्या नांवे "श्री कालिका कला मंडळाची" स्थापना १९४९ साली केली. नंतर फेब्रुवारी १९५९ मध्ये धर्मादाय आयुक्तांकडे संस्थेची रीतसर नोंदणी केली गेली.
मंडळाच्या स्थापनेनंतर मंडळातील सदस्यांनी भजन मंडळ, श्री कालिका वाचनालय, कालिका संगीत विद्यालयाचे कार्य सुरू केले. गोमंतकीय मंडळी ही नाट्यप्रेमी. त्यांनी विष्णू भिकाजी चोडणकर यांच्या पुढाकाराने नाट्य मंडळ स्थापन केले .श्री कालिका कला मंडळाने अनेक सामाजिक व ऐतिहासिक नाटकं सादर करून उल्हासनगरच्या नाट्यप्रेमींना तृप्त केले होते. सार्वजनिक गणेशोत्सवात श्री कालिका कला मंडळाप्रमाणेच अन्य २-३ नाट्य मंडळंही नाटकं सादर करीत.यात कालिका कला मंडळाचे ऐतिहासिक नाटक हमखास असे त्यापैकी नेकजात मराठा, सिंहगर्जना,पराक्रमी पेशवा, शिवकंकण,सरनोबत, जिंजीहून सुटका, रायगडची राणी, मराठ्याची मुलगी ही गाजलेली काही ऐतिहासिक नाटकं तर तुझं आहे तुजपाशी, कथा कुणाची व्यथा कुणा, लग्नाआधी वरात, वेगळं व्हायचं मला,खोली पाहिजे ही सामाजिक नाटकंही सादर केली होती.
श्री कालिका कला मंडळाची नाटकं हे उल्हासनगरकरांचे खास आकर्षण असायचे. या नाटकांत अनंत चोडणकर, जगन्नाथ चोडणकर, वासुदेव चोडणकर, विष्णू चोडणकर,रवी मालवणकर, काका मालवणकर,पद्मनाभ चोडणकर, लक्ष्मण रेवणकर, शंभू नागवेकर, सुरेंद्र चोडणकर, केशव मालवणकर, सुधीर देवरूखकर, नीता बोरकर,हेमांगी चोडणकर, दर्शना चोडणकर,रोहित चोडणकर,रमेश बानोडकर,सुनील बानोडकर,महेश बानोडकर, नरेश वासुदेव चोडणकर, विजयालक्ष्मी बोरकर,शारदा लोटलीकर, नरहरी नागवेकर, हरी विठ्ठल पेडणेकर आदी कलाकार आपल्या नाट्याभिनयाने रसिकांच्या ह्रदयावर कब्जा मिळवत असत. संगीतकार म्हणून सी.चंद्रकांत उर्फ चंद्रकांत चोडणकर व रवी (रविंद्रनाथ) मालवणकर हे जबाबदारी पार पाडत असत. महिला पात्र प्रभाकर बानोडकर, यशवंत नागवेकर, विनायक पेडणेकर यांनी रंगविली होती. रंगभूषेची जबाबदारी सुर्यकांत शिंदे, दत्तू खोत हे पार पाडत.तर दिग्दर्शक म्हणून प्रारंभी भिकाजी वासुदेव चोडणकर व नंतर जगन्नाथ भिकाजी चोडणकर हे करीत असत. हा सुवर्णकाळ १९८५ पर्यंत सुरू होता.मात्र नंतरच्या पिढीचा नाटकाकडील ओढा कमी झाल्याने त्यात खंड पडला.
भारतीय शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी मंडळ दरवर्षी उदयोन्मुख कलाकाराना व्यासपीठ उपलब्ध करुन देते. या अंतर्गत आशा पारसनीस, वंदना भागवत, आशा खाडीलकर, रश्मी जेरे, चंद्रशेखर बर्डे, लक्ष्मणप्रसाद व गोविंदप्रसाद जयपुरवाले, दिनकर पणशिकर, गोविंदराव वेर्लेकर, वसंत काडणेकर, शुभदा पराडकर, रामदासबुवा खुळे, वंदना कट्टी, आनंदराव पेडणेकर, ग़ोविंदराम माथुर,, राणी चक्रवर्ती, भगवान धारप, शुभांगी जेरे, अलका जोशी, विद्या जाधव,हिमांगी वेर्णेकर, सुजन साळकर, प्रह्लाद हडफडकर, पं सदाशिव पवार, अरुण कशाळकर,विश्वनाथ शिरोडकर, सदाशिव ओतुरकर, भट्टचारजी,प्रभाकर बानोडकर,राजेंद्र पेडणेकर, केवलराम,,गुलाबराय, गोबिंदराम, यशवंत यादव (हार्मोनियम), भगवानदास, मनोज शिरोडकर, मीनल साळकर, प्रशांत चोडणकर कु. वैष्णवी फाटक (नृत्य) ई. चे गायनाचे कार्यक्रम आयोजीत केले गेले. त्याचप्रमाणे श्री बाळकृष्ण चोडणकर यांच्या सहाय्याने चित्रकला/रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या गेल्या
श्री कालिका कला मंडळाचे भजनी मंडळ हे उल्हासनगर मधील एक नामांकित भजनी मंडळ आहे. त्याची सुरुवात कै. सदाशिव लोटलिकर यानी केली. त्याना कै चंद्रकांत चोडणकर( हार्मोनियम) व श्री जगन्नाथ चोडणकर(तबला) यांची समर्थ साथ लाभली. आजतागायत या भजनी मंडळाचे शास्रीय गायनावर आधारित भजनाचे कार्यक्रम ठिक ठिकाणी होत असतात. श्री कालिका संगीत विद्यालयाची धुरा सुरवातीस कै चंद्रकांत चोडणकर व श्री जगन्नाथ चोडणकर यानी साम्भाळली. सध्या हार्मोनियम, गायन चे (प्रशांत चोडणकर, संगीत विशारद) व तबला वादनाचे (रोहीत चोडणकर) शास्रशुद्ध प्रशिक्षण देत आहेत.
मंडळ साहित्य/क्रिडा या क्षेत्रातही कार्यरत आहे.
मंडळाने सन १९८५ ला मराठा विभागात तत्कालीन चिटणीस घनःश्याम बानोडकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मालकीच्या जमिनीवर एक छोटेखानी सभाग्रुह बांधले. सन २०१८ मध्ये मिलींद चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यापुढे एक मजली भव्य सभागृह बांधून त्यावर कळस चढविला. अतिशय अल्प दरात स्थानिक नागरीकाना या सभागृहाचा, लाभ घेता येतो. त्याचप्रमाणे मंडळाचे सर्व कार्यक्रम या सभागृहात साजरे होतात.
सन १९४९ पासुन मंडळाने असंख्य उदयोन्मुख कलाकाराना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यात गायन, नाट्य, नृत्य, चित्रकला, वादन, साहीत्य इ. विविध क्षेत्रांचा समावेश आहे. आगामी काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. या कार्यासाठी देणगी देण्याचे आवाहन मंडळ आपणास करीत आहे.